… म्हणून हार्दिक पटेलचे थोबाड फोडले, हल्लेखोराने सांगितले धक्कादायक कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमधील पाटीदार समाजाचे काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात भडकावणाऱ्या आरोपीने यामागील कारण स्पष्ट केले आहे. पत्नी गरोदर असतानाच गुजरामध्ये विविध मागण्यांसाठी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाजाचे आंदोलन सुरू होते. पत्नी रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. या आंदोलनामुळे मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असे हल्लेरोखाने सांगितले.

असा प्रकार एकदाच नव्हे तर दोनदा घडल्याचे तरुण गुर्जर यांनी सांगितले. दुसऱ्यांदा मुलगा आजारी असताना मेडिकलमध्ये गोळ्या आणण्यासाठी गेलो तेव्हा आंदोलनामुळे सर्व बंद होते. त्यांनी सर्व रस्ते बंद केले होते, सर्व दुकाने बंद केली होती, संपूर्ण गुजरातच बंद केला होता. हे काय आहे. हिटलरशाही नाही तर काय आहे? असा उद्विग्न सवालही गुर्जर यांनी उपस्थित केला. त्याच वेळी मी ठरवले की, मला या व्यक्तीचे थोबाड फोडायचे आहे. मी त्याला योग्य धडा शिकवला आहे, असे आरोपीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

शुक्रवारी भरसभेत भाषण सुरू असताना सदरा आणि पायजमा घातलेल्या व्यक्तीने मंचावर चढून पटेल यांना कानाखाली मारली होती. या व्यक्तीला हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे. तरुण गुर्जर असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर सुरेंद्रनगर येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुरुवारी भाजप प्रवक्त्यांवर बूटफेक
याआधी गुरुवारी भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल नरसिम्हा रेड्डी यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. या बूटफेकीप्रकरणी शक्ती भार्गव नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला होता.