हे इतिहासात कधीच घडलं नव्हतं, मोदीजी इतके का घाबरले? दिग्विजय सिंह यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
digvijay-singh

संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेत्याला तपास संस्थेने बोलावले, असे लोकशाहीच्या इतिहासात कधीच घडलेले नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलावणे आवश्यक असते तर ते सकाळी 11 च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर करता आले असते. मोदीजी इतके घाबरले का?; असा सवाल काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यावरून खर्गे हे भडकले असून त्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असताना ईडी मला समन्स कसे पाठवू शकते? असा प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहे.

‘मला ईडीचे समन्स आले आहे. दुपारी साडे बारा वाजता मला ईडी समोर हजर राहण्यास सांगितले आहे. मी कायद्याचे पालन करू इच्छितो. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू आहे तर मी कसा जाणार… अधिवेशन सुरू असताना ईडी मला समन्स कसा बजावू शकते?’ असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत विचारले.