अफगाणिस्तानची विजयाची पाटी कोरीच, वेस्ट इंडीजचा शेवट गोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
west-indies-world-cup-team

सामना प्रतिनिधी । लीडस्

अफगाणिस्तानची वर्ल्ड कपमधील विजयाची पाटी अखेर कोरीच राहिली. वेस्ट इंडीजने येथे झालेल्या लढतीत अफगाणिस्तानवर 23 धावांनी विजय मिळवला आणि प्रतिष्ठsच्या स्पर्धेतील शेवट गोड केला. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आल्याने या लढतीचा निकाल सेमी फायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता. 77 धावा करणाऱया शेई होपची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. वेस्ट इंडीजने दोन विजयांसह पाच गुणांची कमाई केली आणि नववे स्थान कायम राखले. अफगाणिस्तानला मात्र नऊ सामन्यांमध्ये पराभवांसह तळावरच समाधान मानावे लागले.

विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर इविन लुईस (58), शई होप (77), शिमरोन हेटमायर (39), निकोलस पूरन (58) व कर्णधार जेसन होल्डर (45) यांनी आक्रमक फलंदाजी करून विंडीजला तीनशेचा टप्पा ओलांडून दिला. अफगाणिस्तानकडून दवलत झदरानने 2 तर सय्यद शिरझाद, मोहम्मद नबी व राशीद खान यांनी एक बळी टिपला.

रहमत, अलिखीलची झुंज

वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या 312 धावांचा पाठलाग करणाऱया अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंतच मजल मारता आली. रहमत शाहने 62 धावांची आणि इक्रम अलिखीलने 86 धावांची खेळी साकारत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना काही विजय मिळवून देता आला नाही. वेस्ट इंडीजकडून केमर रोचने 37 धावा देऊन तीन आणि कार्लोस ब्रेथवेटने 63 धावा देऊन चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

धावफलक

वेस्ट इंडीज : इविन लुईस झे. नबी गो. राशीद 58, होप झे. राशीद को. नबी 77, हेटमायर झे. बदली (नूर अली) गो. दवलत 39, निकोलस पूरन धावबाद (इक्रम/सयद) 58, जेसन होल्डर झे. दवलत गो. शिरझाद 45. अवांतर : 13, एकूण : 6 बाद 311 धावा. गोलंदाजी : दवलत झदरान 9-1-73-2, सयद शिरझाद 8-0-56-1, मोहम्मद नबी 10-0-56-1, राशिद खान 10-0-52-1.

अफगाणिस्तान : रहमत झे. गेल. गो. ब्रेथवेट 62, इक्रम पायचीत गो. गेल 86. अवांतर : 14, एकूण : सर्व बाद 288 धावा. गोलंदाजीः रोच 10-2-37-3, ब्रेथवेट 9-0-63-4.

आजची लढत

पाकिस्तान वि. बांगलादेश

लंडन, दुपारी तीन वाजता