
गुहागर तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी असलेल्या बामणघळ या पर्यटनस्थळी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना घळीत पडून ठाण्यातून आलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. सुचेता माणगावकर (33) या सेल्फी घेताना घळीत तोल गेल्याने पडल्या. पत्नीला वाचवण्यासाठी गेलेले अनंत माणगावकरही (36) या धोकादायक घळीत पडले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
बचावकार्यात सुहास भाटकर, अंगद भाटकर, गजानन पवार, अमेय हळदणकर, दीपक भाटकर, मिलिंद पाटेकर, अभिजित राऊत आदींचा सहभाग होता.
…अन् त्यांचा मृत्यू ओढवला
भाचा, अनंत आणि सुचेता तिघेही घळीवर गेले. तिथे सेल्फी घेताना माणगावकर पती-पत्नी घळीत पडले. त्यांच्या वाहन चालकाने दुरूनच ही घटना पाहिली आणि त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी समुद्रकिनाऱयाच्या परिसरात असलेले स्थानिक तरुण धावत घळीपर्यंत पोहोचले. दोघेही घळीत दिसत नाहीत म्हटल्यावर स्थानिक तरुण घळीत पाणी शिरते त्या ठिकाणी खडकात पोहोचले. सुमारे अर्ध्या तासाने घळीच्या मुखातून पती-पत्नी समुद्रात वाहत असताना दिसली. मोठा गळ टाकून स्थानिकांनी दोघांना खडकातून पाण्याबाहेर काढले, परंतु दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला होता.
काय घडले त्यावेळी…
बामणघळीत येणाऱया पाण्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनंत माणगावकर, त्यांचा भाचा आणि त्यांची पत्नी सुचेता असे तिघे घळीच्या काठावर पाणी पाहत होते. यावेळी सुचेताला दोघांचा सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. समुद्राचे घुसळत वेगाने घळीत शिरणारे पाणी सेल्फीसोबत टिपावे यासाठी सुचेता मागे सरकली आणि तिचा घळीत तोल गेला. पत्नी घळीत पडताना पाहून तिला वाचवताना अनंत माणगावकर हेही घळीत पडले. पाण्याच्या वेगामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यात दोन्ही बाजूला असलेल्या दगडांवरही ते दोघे आपटले आणि पाण्यात दिसेनासे झाले.





























































