भांडणामुळे बायको चिडली, गरम अॅसिड तिखट टाकून नवऱ्यावर फेकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरा बायकोमध्ये होणारं भांडणं ही तशी नेहमीची बाब. पण, या भांडणाच्या भरात असलेल्या एका पत्नीने नवऱ्याला गंभीर जखमी केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे ही घटना घडली आहे.

ही घटना बरेली येथील नवाबगंज येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या मोहम्मद यासीन याचा विवाह सहा वर्षांपूर्वी फराह हिच्याशी झाला होता. या जोडप्यात वरचेवर भांडणं व्हायची. काही काळापूर्वी यासीनच्या कुटुंबीयांनी फराहविरोधात तक्रार दाखल केली होती.

दुसरीकडे यासीन दारू पिऊन फराहला मारहाण करत असल्याचीही माहिती मिळत आहे. घटनेच्या दिवशी देखील त्यांच्यात वाद झाले होते. अखेर संतापलेल्या फराहने एक भयंकर पाऊल उचललं. त्याने आधी बाथरूम साफ करण्याचं अॅसिड गरम करायला ठेवलं. ते उकळू लागलं तेव्हा तिने त्यात लाल तिखटाची पूड टाकली.

ते मिश्रण तिने नवऱ्यावर ओतलं. त्यामुळे यासीन तडफडू लागला. या हल्ल्यानंतर फराह फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. यासीनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.