
सामना प्रतिनिधी, भोकरदन
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वरूड वाघ येथे शनिवारी सकाळी सहा वाजेपासून वरुड गावातील परिसरात एका पिसाळलेल्या रानडुकराने तब्बल तीन तास धुमाकूळ घालून गावातील सात जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. या जखमींपैकी गवणाजी धनराज (65) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी 6 वाजेदरम्यान वरुड येथे गाव परिसरामध्ये अचानक एका पिसाळलेल्या रानडुकराचे आगमन होऊन पिसाळलेल्या रानडुकराने धुमाकूळ घालत सकाळी सहा वाजता दरम्यान काही जण बाहेर असलेल्यांना या रानडुकराने धुमाकूळ घालत तावडीत सापडेल त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात पिसाळलेले रानडुक्कर यशस्वी होऊन या रानडुकराने तब्बल सात जणांवर हल्ला केला व त्यांना जखमी केले. यामध्ये शंकर वाघ (28), यादव वाघ (58), देविदास बावस्कर (38), संदीप वाघ (35), निलेश सोनवणे (17) हे जखमी झाले असून गवणाजी धनराज (65) हे सगळ्यात जास्त गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या सातही जणांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिसाळलेल्या रानडुकराला केले ठार
आज सकाळी रानडुकराने धुमाकुळ घालत सात जणांना जबर जखमी केले. गावातील नागरिकांनी एकत्र येवून या रानडुकराला घेऱ्यात घेऊन ठार केले आहे.































































