
शिरूरच्या पश्चिम भागात वन्य प्राण्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असताना आज इचकेवाडी येथील श्रीरंग इचके यांच्या शेतातील विहिरीत एक मोठे रानमांजर त्यांना मृतावस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी तातडीने शिरूर वन विभागाला माहिती देताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने या मृत रानमांजराला एका प्लास्टिक क्रेटच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढले. वन विभागाकडून या घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून कुजलेल्या अवस्थेत असलेल्या व दुर्गंधी सुटलेल्या या रानमांजरावर लगेचच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेबाबत वनपाल चारुशीला काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुधा भक्ष्याच्या शोधात किंवा अंधारात रस्ता भटकल्याने हे अंदाजे एक वर्ष वयाचे रानमांजर विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असे सांगितले. परिसरातील नागरिकांना मात्र हा बिबट्या असावा असे वाटले होते. वन विभागाच्या वनपाल चारुशीला काटे वनरक्षक सविता चव्हाण यांसह रेस्क्यू टीममधील हनुमंत कारकुड, शौकत शेख, सागर गारे यांनी तत्पर या ठिकाणी जाऊन पाहणी केली व त्या मृतावस्थेतील रानमांजरास विहिरीतून बाहेर काढले. रानमांजराच्या अशा दुर्दैवी मृत्युमुळे वन्यप्रेमी व निसर्गप्रेमी नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात आली.





























































