
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीव तस्करीचा भांडाफोड करण्यास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) ला यश आले आहे. सीआयएसएफने बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून संशयास्पद हरणाची शिंगे जप्त केली आहेत. या प्रवाशाला वन्यजीव संरक्षण प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका प्रवाशाच्या हँडबॅगेत काही संशयास्पद वस्तू दिसल्या. हा प्रवासी दिल्लीहून बँकॉकला चालला होता. संशयावरून बॅगेची तपासणी केली असता, त्यात हरणाची शिंगे लपवून ठेवल्याचे आढळले. संबंधित प्रवाशाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. विमानतळ सुरक्षा पथकांच्या सतर्कतेमुळे वन्यजीव तस्करीचा प्रयत्न उधळला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
























































