ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा देऊ- छगन भुजबळ

ओबीसींना मंडल आयोगापासून आरक्षण मिळाले आहे. 52 टक्क्याने असलेल्या ओबीसीला आता केवळ 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आमचा लढा आहे. आमचं आरक्षण हिरावून घेऊ नका, आम्ही आमचं आरक्षण टिकविण्यासाठी तीव्र लढा देऊ, असेही भुजबळ म्हणाले.

रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे ओबीसी आरक्षण संपतय या भीतीने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या भरत कराड याच्या कुटुंबीयांची आज मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड व इतर ओबीसी नेतेदेखील उपस्थित होते.

मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, त्यासाठी ओबीसींनी आपआपले सर्व मतभेद बाजूला सारून एकजूट करावी, ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठीच्या लढय़ाला साथ द्यावी आम्ही आहे ते आरक्षण टिकवू, पण कोणीही ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारू नये, अशी विनंती भुजबळ यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र द्यावेत, असा जी.आर. काढला आहे. हा जी.आर. पूर्णपणे दबावाखाली काढला असून, हा जी.आर. म्हणजे ओबीसींच्या मुळावर काढलेला जी.आर. आहे. खरे तर हा जी.आर. शासनाने माघार घ्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण आहे. त्याची अंमलबजावणी चालू आहे. तसेच ईडब्ल्यूएस नावाने 10 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाचा 90 टक्के लाभ मराठा समाजाला मिळतो आहे. याशिवाय हे सर्व ओपनमधील लाभ देखील मिळवीत आहेत. असे असताना ओबीसीतून यांना आरक्षण कशासाठी हवं आहे, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.