देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले.
मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती, मी भाजपमध्ये प्रवेश द्या असे कधीही म्हटले नव्हते. मला भाजपमधून या असं आमंत्रण होतं. हे आमंत्रण कसं होतं हे जयंत पाटील आणि शरद पवारांनाही माहीत आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी प्रचार करणार आहे, असे खडसे म्हणाले.
म्हणून महाजनांचा जामनेरमध्ये नंबर
जामनेर मतदारसंघ हा 35 वर्षांपूर्वी शिवसेनेचा होता. डॉ. मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी मी येथे येत होतो. गिरीश महाजन सरपंच होते. त्या कालखंडात हा मतदारसंघ भाजपने बदलून घेतला म्हणून महाजनांचा नंबर लागला आणि आता ते माझ्या डोक्यावर बसलेत, असा टोला खडसे यांनी महाजन यांना लगावला.