गोवा माइल्सच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार : सोपटे

सामना प्रतिनिधी । पणजी

गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाच्या हिताचा विचार करत गोवा माइल्स उपक्रमाच्या पाठीशी उभे राहाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही उपद्रवी शक्तींच्या दबावापुढे झुकून ही अॅप आधारित टॅक्सी सेवा बंद किंवा खंडित करण्याच्या मागणीचा विचार केला जाणार नाही, असे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी गोवा माइल्सच्या विरोधकांना ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गोवा माइल्स या अॅप आधारित टॅक्सी सेवेला स्थानिक टॅक्सीचालकांच्या असलेल्या विरोधाबद्दल चर्चा झाली होती. त्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष सोपटे यांनीही सरकार गोवा माइल्सच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सोपटे म्हणाले, ‘गोवा माइल्समध्ये अद्याप सहभागी न झालेल्या स्थानिक टॅक्सी चालकांना आम्ही आवाहन करतो, की त्यांनी येत्या ऑगस्टमध्ये आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या गोवामाइल्सच्या विरोधात उभे राहाण्याऐवजी व त्याला विरोध करण्याऐवजी त्यामध्ये सहभागी व्हावे.’

सोपटे म्हणाले, ‘आज काही टॅक्सीचालक केवळ अज्ञान आणि मत्सरापोटी गोवा माइल्सवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, कारण त्यांचे काही सहकारी गोवा माइल्समध्ये सहभागी होऊन चांगली प्रगती करत आहेत. विरोधकांची ही कृती निव्वळ स्वार्थी असून ते इतरांना आपले हित साधण्यापासून रोखत असल्याचे दिसत आहे.’