
गिरगाव येथील विल्सन जिमखाना परप्रांतीयांच्या घशात घालू नका, अशी मागणी ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने केली आहे. याबाबत ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. विल्सन जिमखान्याची जागा ही खेळासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ती खेळासाठीच राहिली पाहिजे, अशी ठाम भूमिका गिरगावकर संस्थेने मांडली.
विल्सन जिमखान्याचा एक लाख चौरस फुटांचा हा भूखंड विल्सन कॉलेजकडे होता. त्याचे लीज 2023 मध्ये संपल्यानंतर राज्य सरकारने हा जिमखाना जैन संस्थेला 30 वर्षांच्या लीज करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक खेळाडूंनी न्यायालयातही धाव घेतली आहे. ही जागा स्थानिक खेळाडूंसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने केली आहे. या ठिकाणी स्थानिक मुलांना कबड्डी, खो-खो, मल्लखांब आदी पारंपरिक खेळांसाठी राखीव ठेवावी, अशा मागणीचे निवेदन ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने मुंबई शहर जिल्हाधिकारी अचल गोयल यांना निवदेन दिले आहे. यावेळी सचिव शिल्पा नायक, गौरव सागवेकर, मिलिंद वेदपाठक, विघ्नेश सुंदर, पुणाल निमजे आदी उपस्थित होते. याबाबत महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेकडून सांगण्यात आले.
…अन्यथा जोरदार आंदोलन
विल्सन जिमखान्याची जागा ही स्थानिकांना पारंपरिक खेळ, सराव आणि सांस्पृतिक कार्यक्रमांसाठीदेखील उपलब्ध होते. मात्र ही जागा आता ‘जितो’ या जैन संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करून लवकरात लवकर निर्णय घेऊन जागा स्थानिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




























































