
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटन हिने सोमवारी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. संघातील खराब वातावरणाला वैतागून आपण हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱया 31 वर्षीय डिएंड्रा डॉटीनने ट्विटरवरून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. ती म्हणाली, ‘क्रिकेट कारकिर्दीत मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र संघातील सध्याचे वातावरण अतिशय प्रतिकूल आहे.
अशा खराब वातावरणात खेळातील उत्साह वाढविणे किंवा टिकवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मी नाइलाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करत आहे. डिएंड्रा डॉटीनने 2010च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफिकेविरुद्ध केवळ 38 चेंडूंत वादळी शतक ठोकून महिला क्रिकेटमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. गोलंदाजीतही तिने वेळोवेळी संघाची मदत केलेली आहे. आता आपण यापुढे केवळ जगभरातील लीग क्रिकेट खेळत राहू असेही डॉटीनने सांगितले.

























































