
सामना प्रतिनिधी । मुंबई
अनेकदा ग्रामीण भागात दारूचा परवाना घेऊन त्यानंतर तो शहरी भागात स्थलांतरित करण्यासाठी वाईन शॉपवाल्यांची धडपड सुरू असते. राज्यातील सुमारे 200 वाईन शॉप तसेच देशी दारूच्या दुकानदारांनी अशी स्थलांतरणाची परवानगी मागितली आहे. यावर तोडगा म्हणून उत्पादन शुल्क विभागाने एक किलोमीटरची अट टाकली आहे. ज्या ठिकाणी दारूचे दुकान असेल त्या ठिकाणी एक किमीच्या परिसरात कोणताही परवाना स्थलांतरित करता येणार नाही.
राज्यात सुमारे 200 वाईन शॉप व देशी दारू दुकानदारांनी परवाने स्थलांतरीत करण्याची परवानगी मागितली आहे. अशी परवानगी मागणारी अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने परवानाधारक दुकानदारांनी न्यायालयात दाद मागितली होती. आता राज्य सरकारने नियमामध्ये सुधारणा केली असून, तोटय़ात असलेल्या मद्य व्यवसायिकांना आपला व्यवस्याय वाढवण्याची नकी संधी देण्यात आली आहे. ही संधी देताना राज्य शासनाने ज्या ठिकाणी एक किलोमींटरच्या आसपासच्या परिसरात इतर कुठलेही मद्य विक्रीचे दुकान नसेल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याची परवानगी दिली आहे. हे नियम देशी व विदेशी दोन्ही मद्यांवर लागू असणार आहेत. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार तोटय़ात असलेला मद्य विक्री व्यायसायिक नवीन नियमावलीनुसार आपले दुकान स्थलांतरित करू शकणार आहे.
परवान्यांचा लिलाव
राज्यातील विविध जिह्यांत असणारे देशी-विदेशी मद्यांचे परवाने विविध कारणांनी बंद आहेत. परंतु अशा परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याने ते बंद स्थितीत आहेत. अशा सुमारे 201 मद्याच्या दुकानांच्या परवान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिह्यात दुकान मंजूर आहे, परंतु परवाना सुरू नाही अशा परवान्यांचा लिलाव हा संबंधित जिह्यातच करण्यात येणार आहे.























































