विंटेज गाडय़ांना मिळणार स्पेशल नंबर

653

विंटेज किंवा जुन्या ऐतिहासिक गाडय़ांना आता नवी ओळख मिळणार आहे. या गाडय़ांना स्पेशल नंबर प्लेट देण्याचा निर्णय राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला असून त्यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या गाडय़ांच्या नोंदणी क्रमांकात आता VA असा उल्लेख असेल. राज्याच्या कोडनंतर हा क्रमांक लिहिला जाईल. महाराष्ट्रातील गाडीच्या नंबर प्लेटवर MH VA XX 8127 असे लिहिले जाईल.

ज्या गाडय़ांची नोंदणी 50 वर्षांपूर्वी करण्यात आली असेल अशा गाडय़ांना हा स्पेशल नंबर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यात एक विंटेज मोटर वाहन समितीही स्थापन करण्यात येणार असून त्याअंतर्गत गाडयांची सध्याची स्थिती तपासण्यात येईल. त्यानंतर या गाडय़ांना स्पेशल नंबर द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या वाहनांचा वापर केवळ प्रदर्शनासाठीच करता येणार

या वाहनांचा वापर दैनंदिन वापरासाठी करता येणार नाही. केवळ एखादे प्रदर्शन, रॅली किंवा कार्यक्रमात या वाहनांचा वापर करता येईल. विंटेज गाडय़ांना इंधन भरण्याची किंवा रस्त्यावर चालवण्याची परवानगी नसेल असेही या वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या ड्राफ्टमध्ये म्हटले आहे.

मालकाला द्यावे लागणार पुरावे

संबंधित विंटेज गाडय़ांच्या मालकांना गाडीच्या नोंदणीसाठी वाहनाशी संबंधित पुरावे किंवा दस्तऐवज सादर करावे लागणार आहेत. यात इन्शुरन्स पॉलिसी, रजिस्ट्रेशन पेपर किंवा वाहनाची बिल कॉपी द्यावी लागेल. याशिवाय संबंधित गाडी नोंदणीकृत असेल तर विंटेज मोटर वाहन स्टेट कमिटीद्वारे त्यासाठीची सत्यता तपासण्यात येणार आहे. या समितीची मंजुरी मिळाल्यानंतर विंटेज मोटर वाहन राज्य नोंदणी प्राधिकरणाच्या वतीने या गाडय़ांना नोंदणी क्रमांक देण्यात येईल. हा क्रमांक दहा वर्षांसाठी वैध असेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या