मुंबईसह राज्यात थंडीची चाहूल

परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. येत्या आठवडाभरात किमान तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही थंडीची तीव्रता हळूहळू वाढेल आणि पुढील दोन दिवसांत किमान तापमान 19 अंशांपर्यंत खाली घसरेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाने राज्यभरात उशिरापर्यंत धुमशान घातले. त्यामुळे थंडीचे आगमन लांबणीवर पडले होते. अखेर राज्याच्या अनेक भागांत गुरुवारपासून थंडीची चाहूल लागली आहे. पुढील दोन दिवसांत काही भागांत पावसाची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान किमान तापमानातही मोठी घट होणार असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडय़ात थंडीची चाहूल लागणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत किमान तापमानात 4 ते 5 अंशांची घट होणार आहे. बंगालच्या उपसागरावर घोंघावणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती धूसर झाल्याने वातावरणात बदल होणार आहे.