उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कहर; 118 वर्षांतील विक्रम मोडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानसह राजधानी दिल्लीमध्ये थंडीच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या थंडीच्या लाटेने 118 वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत. उत्तर हिंदुस्थानात शनिवारी पहाटे कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. उत्तर हिंदुस्थानला थंडीच्या लाटेने चांगलेच झोडपून काढले आहे.  नवी दिल्ली, लुधियाना या शहरांतही पारा घसरत आहे.

थंडीचा कडाका वाढल्याने उत्तर हिंदुस्थानवर धुक्यांची दाट चादर पसरली आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही होत आहे. थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आणखी आठवडाभर थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत 1991 नंतर दुसऱ्यांदा डिसेंबर महिन्यात सर्वाधिक थंडी आहे. या लाटेने याआधीचे विक्रम मोडले आहेत. दिल्लीत पारा 1.7 अंशांच्या खाली गेला आहे. त्यामुळे तापमान शून्य अंशाच्या खाली गेल्यास ही डिसेंबरमधील सर्वाधिक थंडी ठरणार आहे.

दिल्लीत शनिवारी पहाटे पालम या भागात 3.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर सफदरजंगमध्ये  2.4 अंश सेल्सियस तापमान होते. लोधी रोड या भागात 1.7 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. आया नगर येथे 1.9 अंश सेल्सियस तापमानाची  नोंदवण्यात आले. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 1919, 1929, 1961 आणि 1997 या वर्षात डिसेंबरमधील सरासरी कमाल तापमान 20 अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. यावर्षी डिसेंबरमध्ये आतापर्यंतचे सरासरी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. येत्या आठवड्यात 19.15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1901 नंतरचा हा दुसरा सर्वाधिक थंडी असलेला डिसेंबर महिना ठरणार आहे. याआधी 1997 या वर्षात सरासरी कमाल तपमान 17.3 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले आहे.