
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवाच्या तयारीबरोबरच खरेदीचा उत्साहही दिसत आहे. आजचा रविवार हा गणपतीच्या खरेदीसाठीचा सुपरसंडेच ठरला. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर आदी मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणात जातात. मुंबईतही मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. त्यानिमित्त खरेदीलाही उत्साह असतो. घरगुती गणपतींसाठी मखर, सजावटीचे साहित्य, तोरणे, रोषणाईचे सामान यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. सध्या कराओकेचा ट्रेंड असल्याने कराओके सेटला मोठी मागणी असल्याचेही दुकानदारांनी सांगितले.
- दादर मार्केटमध्ये तसेच लालबाग येथे रेडिमेड मखर घेण्यासाठी आज गर्दी झाली होती.
- क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळीच्या परिसरात रोषणाईची तोरणे, लाईट्स, स्पीकर्स आदींच्या खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
- प्लॅस्टिकची फुले, माळा, तोरणांचा वापरही गणपतीजवळ आरास करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यातही नवनवीन डिझाईन्स बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.