
>> अभय मिरजकर
मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा उदोउदो करत घराघरांत गॅस कनेक्शन पोहोचवल्याचा डांगोरा पिटला खरा, पण आता त्याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुन्हा एकदा पारंपरिक इंधनाकडे वळले आहेत. ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटत आहेत. चुलीसाठी सरपण गोळा करताना महिला, पुरुष दिसत आहेत. यासोबत आता ठिकठिकाणी शेणाच्या गोक्यांचे ‘उडवे’ रचले जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
निवडणुकीच्या काळात ‘बजेट’ सांभाळण्याची मोठी मोठी आश्वासने देणाऱ्या केंद्र सरकारचे सर्व दावे आता धुळीला मिळाले आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आखाती देशांतील युद्धाचे कारण पुढे करून तेल आणि गॅ सच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. एकीकडे उज्ज्वला गॅसचे रिकामे सिलिंडर कोपऱ्यात पडून आहेत, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांना पुन्हा एकदा लाकूडफाटा आणि गोवऱ्या गोळा करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
गैस परवडत नसल्याने ग्रामीण भागात आता पुन्हा शेणापासून गोवऱ्या थापून त्या वाळत घालणे आणि त्यांचे ‘उडवे’ (साठा) तयार करणे सुरू झाले आहे. रानातून लाकूडफाटा गोळा करून त्यावर स्वयंपाक करण्याची वेळ गृहिणीवर आली आहे.
गॅस रिफिल करणे आत्ता आवाक्याबाहेर गेल्याने कष्टकरी कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गॅसचे भाव १०००-१२०० च्या पार गेले आहेत. मजुरी करून घर चालवायचे की गॅस भरायचा याचेच कोडे सर्वांना पडलेले आहे.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून योजना आखल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. युद्धजन्य परिस्थितीचे कारण पुढे करून सामान्य जनतेची लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला जगणे मुश्किल होईल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

























































