
पॅनोरमा डॉक्यूमेंट्री वादाच्या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसीला अब्ज डॉलर्सचा खटला भरण्याची धमकी दिली आहे. बीबीसीने संपूर्ण प्रकरणात आपली चूक मान्य केली आहे. डॉक्यूमेंट्रीमध्ये ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या दंगलींशी संबंधित एक भाग समाविष्ट होता. त्या दिवसाचे ट्रम्प यांचे भाषण चुकीचे संपादित केले गेले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः हिंसाचार भडकावल्याचा आभास निर्माण झाला. यामुळे गोंधळ उडाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे केलेल्या भाषणात म्हटले होते की, आम्ही कॅपिटॉलमध्ये मोर्चा काढू आणि आमच्या सिनेटरना शांततेने पाठिंबा देऊ. परंतु एडिट करताना “शांततेने” हा शब्द मात्र जाणीवपूर्वक कापण्यात आला होता. त्यानंतर दोन वेगळे भाग एकत्र करण्यात आले होते. पॅनोरमाच्या संपादित आवृत्तीत, आम्ही कॅपिटॉलमध्ये चाल करुन जाऊ आणि लढू असे दाखवण्यात आले होते. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी बीबीसीला अब्जावधी डॉलर्सचा खटला भरण्याची धमकी दिली आहे. ट्रम्पच्या वकिलांनी बीबीसीला एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, “एकतर माहितीपट मागे घ्या किंवा बदनामीला सामोरे जा.” त्यात असेही म्हटले आहे की या माहितीपटामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिमा मलिन झाली आणि निवडणुकीवर परिणाम झाला. अद्याप बीबीसीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बीबीसीने आधीच या प्रकरणात आपली चूक मान्य केली आहे. बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि न्यूज सीईओ डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिला आहे.




























































