पदवी प्रमाणपत्राअभावी मतदार नोंदणी रखडली

पदवी प्रमाणपत्राअभावी मतदार नावनोंदणी होऊ न शकलेल्या पदवीधरांना पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पदवीधरांना परीक्षा विभागाकडे 17 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून नावनोंदणी सुरू आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून ज्या विद्यार्थ्यांना 27 डिसेंबर व त्यापूर्वी पार पडलेल्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान करण्यात आली आहे, मात्र पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे मतदार यादीत नावनोंदणी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अर्जांना अनुसरून तयार करण्यात येणारे पदवी प्रमाणपत्रांचे वाटप 24 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज भवन येथे करण्यात येणार आहे. ही मोहीम पदवीधर विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे शक्य व्हावे यासाठी राबविण्यात येणार असून मुदतीनंतर येणाऱया अर्जांचा विचार केला जाणार नाही, अशा सूचना परीक्षा विभागाने जारी केल्या आहेत.

संपर्क साधा

पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी 17 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कालिना कॅम्पस येथील छत्रपती शिवाजी महाराज भवन येथे संपर्क साधायचा आहे. विद्यार्थ्यांना अंतिम सत्राची अथवा वर्षाची गुणपत्रिका अर्जासोबत सादर करणे आवश्यक असणार आहे.

प्रमाणपत्र गहाळ झाल्यास दुय्यम प्रत मिळणार

ज्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र गहाळ झाले आहे, अशा पदवीधरांना दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्राची द्य्युम प्रतदेखील देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राची अथवा वर्षाची गुणपत्रिका, पोलीस प्रशासनाकडील प्रमाणपत्र गहाळ झाल्याचा दाखला व विहीत शुल्क भरणा केल्याची पावती जोडणे आवश्यक असणार आहे.