
सामना प्रतिनिधी । कर्जत
कर्जत तालुक्यातील सावळे ग्रामपंचायत हद्दीतील धुळेवाडी येथील शेतकरी काळुराम धुळे यांची एनओसी न घेता त्यांच्या शेतामधून बळजबरीने मुंबई येथील मोहम्मद इरफान वली मोहम्मद मोनारिया या धनिकाने आपल्या बिस्लेरी वॉटर प्रोजेक्टसाठी एसटीलाईन टाकण्याचे काम शेतकऱ्याच्या जमिनीतून सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत असून या धनिकांची अरेरावी थांबणार कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या संदर्भात धुळे यांचा मुलगा सुनिल धुळे याने त्यांना जाब विचारल्यानंतर मी तुमच्यावर जातीय केस दाखल करीन, असे सांगून धमकावण्याचे काम केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
धुळेवाडी येथील रहिवासी असलेल्या काळुराम धुळे यांची येथे सर्व्हे नंबर ३०/८ या क्षेत्रात भातशेती आहे. याच क्षेत्रामधून मोनारिया या धनिकाने शेतकऱ्याची कोणतीही परवानगी न घेता एसटिलाईन टाकण्याचे काम राजकीय आणि प्रशासकीय दबाव निर्माण करुन सुरू केले आहे. या लाईनमुळे त्यांना शेतीमध्ये भविष्यात घर बांधणे अडचणीचे होणार आहे. तसेच लाईटच्या दोन्ही बाजुंनी ठराविक अंतर सोडून आंबा, नारळ, चिकू, काजु, जांभुळ ही फळझाडे आणि काही शेतीपुरक पिके घेताना त्यांजे खुपच मोठे नुकसान होणार असल्याचे धुळे यांनी सांगितले.
धुळे यांनी विद्युत वितरण कंपनीचे अभियंता घुले आणि कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजाता तावडे यांना निवेदन देऊन या धनिकाने आमची एनओसी न घेता शेतीमधून बळजबरीने टाकलेली एसटिलाईन काढून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगितले.
ज्या जागेमधून एसटिलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्या कामाविरुद्ध तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या हरकती आल्याने हे काम सद्या थांबविण्यात आले आहे. असे विद्युत महावितरण कंपनीचे अभियंता आनंद घाले यांनी सांगितले आहे.































































