फुकट्यांकडून कोट्यवधीची वसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱया तसेच बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱयांविरोधात आरपीएफने राबविलेल्या मोहिमेत एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान 23.45 लाख तक्रारी दाखल होऊन त्याद्वारे रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 113.53 कोटी रुपये दंड म्हणून जमा झाले आहेत. गेल्या वर्षी वसूल झालेल्या दंडापेक्षा ही रक्कम 7.40 टक्के जादा आहे, तर मध्य रेल्वेने याच काळात 168.09 कोटींचा दंड फुकटय़ांकडून वसूल केला आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने याच काळात 147 कोटींचा दंड वसूल केला होता. यंदा दंडाच्या रकमेत 14.35 टक्के वाढ झाली आहे.

पश्चिम रेल्वेने रेल्वे आणि गाडय़ांमध्ये फिरणाऱया 2403 भिकारी, 5278 अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक, हुसकावून लावण्यासारखी कारवाई करण्यात आली असून 1255 लोकांना जेलची हवा खाण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

फुकटय़ांच्या केसेसमध्ये 10.65 टक्के वाढ
मध्य रेल्वेने एका जानेवारी महिन्यातच विनातिकीट प्रवाशांवर 2.82 लाख केसेस दाखल केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात 2.51 लाख केसेस दाखल झाल्या होत्या. यंदा केसेसमध्ये 12.35 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान विनातिकीट तसेच बेकायदा सामानाची वाहतूक केल्या प्रकरणात एकूण 32.71 लाख केसेस दाखल झाल्या होत्या तर गेल्या वर्षी याच काळात 29.56 केसेस दाखल झाल्या होत्या. यंदा केसेस दाखल होण्यात 10.65 टक्के वाढ झाली आहे.