
लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित प्रकरणातील काही नवीन गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) सार्वजनिक करण्यात आली असून, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) प्रसिद्ध केलेल्या या कागदपत्रांनुसार, एका अज्ञात महिलेने ट्रम्प यांच्यावर ती अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची २०१९ मध्ये एफबीआयने अनेक वेळा मुलाखत घेतली होती. यानंतर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने दावा केला की, जेव्हा तिचे वय अवघे १३ ते १५ वर्षे होते, तेव्हा जेफ्री एपस्टिनने तिची ओळख डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून दिली होती. न्यूयॉर्कमधील एका इमारतीत ट्रम्प यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
महिलेचा असाही दावा आहे की, गेल्या काही वर्षांत तिला आणि तिच्या जवळच्या लोकांना गप्प राहण्यासाठी असंख्य धमकीचे फोन आले. तिला वाटते की हे फोन एपस्टिनशी संबंधित लोकांकडून आले असावेत.
दरम्यान, एपस्टिन फाइल्समध्ये ट्रम्प यांचे नाव ३८,००० पेक्षा जास्त वेळा आले आहे. १९९० च्या दशकात एपस्टिनच्या खाजगी विमानातून सात ते आठ वेळा प्रवास केल्याचा उल्लेख या नोंदींमध्ये आहे. ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबमधील पाहुण्यांच्या यादीतही त्याचा समावेश आहे.
तपासात अशी माहिती समोर आली आहे की लैंगिक शोषणाचे जाळे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नव्हते. एपस्टिनने एक संघटित तस्करीचे जाळे तयार केले. एपस्टिन फाइल्समध्ये आतापर्यंत १५ देशांमधील श्रीमंत व्यक्ती, राजकारणी आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींची नावे समोर आली आहेत.

























































