चोरी करण्यासाठी तोंड टेपने बंद केलं, महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरांनी वृद्ध दांपत्याच्या तोंडाला टेप लावल्याने त्यातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण मुंबईत घडली आहे. येथील ताडदेव परिसरात एका वृद्ध दांपत्याला लुटण्यात आलं.

मोहन आणि सुरेखा अग्रवाल असं या दांपत्याचं नाव आहे. हे दांपत्य ताडदेव येथे राहतं. रविवारी तीन जण त्यांच्या घरात चोरीसाठी घुसले. हे दांपत्य सकाळी सहाच्या सुमाराला घरातून बाहेर पडत असताना या तिघांनी त्यांच्यावर झडप घातली. ते दोघं ओरडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला टेप लावली आणि त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महागडी घड्याळं घेतली आणि ते फरार झाले.

चोर निघून गेल्यानंतर मोहन यांनी कसंबसं स्वतःला सावरून अलार्म वाजवला त्यानंतर शेजाऱ्यांना या चोरीविषयी कळलं. त्यांनी पोलिसांना बोलवलं. तोपर्यंत सुरेखा बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे.