भायखळा येथे इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार 

भायखळा येथील म्हाडाच्या पाच मजली इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी असून तिची प्रकृतस्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. बुधवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली होती.

भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील म्हाडाच्या उपकरप्राप्त (सेस) अशरफी मंजिल या पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा भाग बुधवारी संध्याकाळी कोसळला. यात दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या नाजिया खान (35) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर खुशनुमा खातून (30) या महिलेवर उपचार सुरू आहेत.