
भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल-जेएनपीए महामार्गावर घडली. स्वप्ना भोईर असे मृत महिलेचे नाव आहे. ही धडक इतकी भयंकर होती की स्वप्ना यांचे पती मिथुन भोईर हे जखमी झाले. लग्न समारंभ आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला. महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
न्हावा गावात राहणारे स्वप्ना आणि मिथुन भोईर हे दाम्पत्य कर्जत येथे लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटपून ते घराच्या दिशेने निघाले. गव्हाणफाटा येथील कान्होबा ढाब्याजवळ ते आले असता पाठीमागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली आल्याने स्वप्ना यांचा जागीच मृत्यू झाला, तर मिथुन भोईर गंभीर जखमी झाले. क्रेनच्या सहाय्याने चाकात अडकलेल्या स्वप्ना यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



























































