‘ती’ मुंबईत आली, पुरूष बनली; सख्ख्या बहिणीच्या सासऱ्याचे एक कोटी लुटून गेली, इन्स्टाग्रामवरून पुरुषाची वेशभूषा करण्याचे ट्रेनिंग घेतले

एका सुरस लुटीच्या घटनेने वसईचे पोलीस चक्रावून गेले आहेत. बहिणीच्या सासऱ्याला लुटण्यासाठी दुसरी बहीण चक्क पुरूष बनली आणि तिने सासऱ्याच्या घरात एण्ट्री करून त्याचे तब्बल एक कोटींपेक्षा जास्त किमतीचे दागिने लुटले. धक्कादायक बाब म्हणजे पुरुषाची वेशभूषा करण्याचे ट्रेनिंग या महिलेने इन्स्टाग्रामवरून घेतले होते. परंतु ‘कानून के हाथ बडे लंबे होते है..’ या म्हणीला जागून वसई पोलिसांनी त्या लुटारू महिलेच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या.

ओधवजी खिमजी भानुशाली (६६) हे वसईतील माणिकपूर येथे एकटेच राहतात. तुमची रूम भाड्याने द्यायची आहे का, अशी विचारणा करत एक पुरूष त्यांच्या घरी आला. त्याने भानुशाली यांच्या घरात एण्ट्री केली आणि बाथरूमला जायचे आहे.. तुमचे वॉशरूम दाखवा असे सांगितले. वॉशरूमजवळ येताच त्या इसमाने भानुशाली यांना वॉशरूममध्ये कोंडले आणि तब्बल एक कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.

७० सीसीटीव्ही फुटेज तपासले

भानुशाली यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षानेही याचा तपास करण्यात येत होता. या कक्षाच्या अधिकारी व अंमलदारांनी ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात भानुशाली यांच्या घरात चोरी केलेल्या इसमाने लुटीचा माल एका ठिकाणी ठेवल्याचे आढळले. या ठिकाणावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवला असता थोड्या वेळाने तेथे एक महिला आली आणि तो चोरलेला माल घेऊन गेल्याचे पोलिसांना दिसले. भानुशाली यांची लुटमार करण्यात कोणतीही महिला सहभागी नव्हती. मग त्या महिलेने या लुटीचा माल कसा नेला याचा तपास पोलिसांनी केला. सीसीटीव्हीत दिसलेले फुटेज आणि तांत्रिक तपासातून हा चोर भानुशाली यांचा गुजरातमधील नातेवाईक असावा असा निष्कर्ष निघाला.

शेअरच्या धंद्यात नुकसान झाल्याने लुटीचा प्लॅन

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे एक पथक गुजरातमधील नवसारीत दाखल झाले. त्यांनी गणदेवी पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी ज्योती मोहन भानुशाली (२७) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. ओधवजी भानुशाली हे माझ्या सख्ख्या बहिणीचे सासरे असून ते एकटेच असतात हे माहीत होते. त्यांच्याकडे खूप पैसा आहे याची माहितीही माझ्याकडे होती. म्हणून त्यांना लुटण्याचा प्लॅन मी बनवला. मी इन्स्टाग्रामवरून पुरुषाची वेशभूषा कशी करायचे याचे ट्रेनिंग घेतले आणि वसईत जाऊन पुरुष बनले आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना लुटले असा घटनाक्रम ज्योती भानुशालीने सांगितला तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. शेअरच्या धंद्यात प्रचंड तोटा झाल्यानेच हा लुटीचा प्लॅन बनवल्याची कबुली तिने दिली.