शेतमजूरी करणाऱ्या महिलेच्या खात्यात आले 10 कोटी रुपये, बॅलेन्स चेक करताना दिसली रक्कम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच गोंधळ निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या बँक खात्यात अचानक जवळपास 10 कोटींची रक्कम जमा झाल्याचे एटीएममध्ये दिसून आल्याने कुटुंबीयांसह स्थानिकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. बॅलन्स चेक करताना ही बाब समोर आली आहे.

या महिलेचे नाव सीता असून त्या गरीब कुटुंबातून येतात. संपूर्ण कुटंब शेतात मजूरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. सीता यांचे बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं होतं. महिलेचा मुलगा अरुण कुमार एटीएममध्ये पिन जनरेट करण्यासाठी आणि अकाऊंटमध्ये बॅलेन्स चेक करण्यासाठी गेला होता. मात्र स्क्रीनवर अचानक कोट्यवधींची रक्कम दिसताच तोही स्तब्ध झाला. “बॅलन्स पाहिला तेव्हा सुमारे 10 कोटी रुपयांची रक्कम दिसत होती. ही रक्कम कुठून आली, कोणाची आहे, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही,” असे त्याने सांगितले. बँक उघडल्यानंतर तातडीने शाखेत जाऊन याबाबत चौकशी करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

सदर महिला सीता हिनेही या व्यवहाराबाबत पूर्ण अनभिज्ञता दर्शवली. “आम्हाला माहीत नाही हे पैसे कसे आले. ज्यांचे आहेत त्यांनी ते परत घेऊन जावेत,” अशी प्रामाणिक भूमिका तिने व्यक्त केली. तिचे पती फरजान यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून या पैशांशी त्यांचा कोणताही संबंध नाही. “बँक सुरू झाल्यावर आम्ही स्वतः जाऊन ही रक्कम परत करण्याची तयारी ठेवली आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एटीएममधील बॅलन्स दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आहे. अनेकांनी बँकिंग प्रणालीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बँक ऑफ इंडियाच्या सुलतानगंज शाखेतील अधिकाऱ्यांनी हा प्रकार “तांत्रिक बिघाड” असल्याचे स्पष्ट केले आहे. शाखा व्यवस्थापकांनी सांगितले की, संबंधित महिलेचे कर्ज खाते असल्यामुळे काही तांत्रिक गडबड झाली असण्याची शक्यता आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महिला किंवा तिच्या कुटुंबीयांनी लवकरात लवकर शाखेशी संपर्क साधला असता, तर ही त्रुटी आधीच दूर केली जाऊ शकली असती.