मुंबईतील बेपत्ता महिलेची जमिनीच्या व्यवहारातून हत्या झाल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संगमेश्‍वर

मुंबईतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह संगमेश्‍वरातील एका खाजणीत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असून जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. स्मिता चंद्रशेखर कुसुरकर (४५, लोअर परळ) असे या महिलेचे नाव आहे.

स्मिता ११ जुलै रोजी सकाळी पावणे आठ वाजता जमिनीच्या कामासाठी कोकणात जाते असे सांगुन घरातून निघून गेल्या. १६ जुलैपर्यंत त्या परत न आल्याने तसंच त्यांचा मोबाईलही बंद झाला. त्यामुळे त्यांचे पती चंद्रशेखर यांनी त्याच दिवशी मुंबईतील ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीत कोकणचा उल्लेख आल्याने ही तक्रार रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे आणि सहकार्‍यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला. सर्वप्रथम त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. यात रत्नागिरीत शेवटचे लोकेशन सापडले. त्यानंतर ११ ते १६ या काळात त्यांचे ज्यांच्याशी संभाषण झाले त्यांचे नंबर तपासण्यात आले. त्यात संगमेश्‍वरातील श्रीकांत घडशी आणि स्मिता यांचे शेवटचे संभाषण झाल्याचे उघड झाले. हा एकच धागा पकडून पोलिसांनी श्रीकांतला गाठण्याचा प्रयत्न केला. संगमेश्‍वरातून तो फरार असल्याचे समजताच पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.

यातून रविवारी मुंबईत सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. श्रीकांतने आपणच स्मिता यांचा घातपात केला असून त्यांचा मृतदेह माभळे सडा येथील खाजणीत टाकल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्रीकांतला संशयित म्हणून अटक केली आहे. तसंच कुसुरकर यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. श्रीकांत घडशीला काही वर्षापूर्वी किरकोळ कारणातून स्वतःच्या पत्नीचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पुरेशा पुराव्यांअभावी तो निर्दोष सुटला होता.