
विमान प्रवासादरम्यान अनेकांना हवेच्या दाबामुळे वेगवेगळे त्रास जाणवतात. पण, गरम होतंय या कारणास्तव कुणीतरी विमानातून बाहेर पडलं तर? अशीच घटना युक्रेनमध्ये घडली आहे.
ही महिला तुर्कस्तानात सुट्टीसाठी गेली होती. सुट्टी संपवून तिने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वदेशात जाण्यासाठी विमान पकडलं. हे विमान तुर्कस्तानातील अंताल्या इथून निघालं होतं. ते युक्रेन येथील कीव विमानतळावर थांब्यासाठी उतरलं होतं. कीव विमानतळाच्या गेट क्रमांक अकरानजीक ते उतरलं. या ठिकाणी विमानाच्या थांब्याचा वेळ थोडा अधिक होता, त्यामुळे उन्हात ते विमान तसंच उभं होतं. पण, त्यामुळे विमानात गरम होऊ लागलं आणि म्हणून एका महिलेने चक्क विमानाचं मधलं आपत्कालीन दार उघडलं. ते दार थेट विमानाच्या पंख्यावर उघडत होतं. त्या दारातून ती महिला बाहेर पडली आणि विमानाच्या पंख्यावर फिरू लागली.
एखाद्या बागेत फिरावं तसं ती पंख्यावर फिरली. इतकं नव्हे तर फिरून झाल्यानंतर विमानाच्या पंख्यावरच फतकल मारून बसली. महिलेची ही वागणूक बघून सगळेच थक्क झाले. या घटनेनंतर तिला पुन्हा विमानात बसवण्यात आलं. मात्र, त्या महिलेला युक्रेन आंतरराष्ट्रीय विमानसेवेने ब्लॅकलिस्ट केलं आहे. त्यामुळे ही महिला आता काही काळ युक्रेनच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा लाभ घेऊ शकणार नाही.

























































