
सामना ऑनलाईन । कोलकाता
महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहेत. पण, काही महिला या कायद्यांचा दुरुपयोग करताना दिसतात. अशाच एका प्रकरणात महिलेला खोटी तक्रार करण्यासाठी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.
या महिलेने एका न्हाव्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. जून महिन्यात महिला तिच्या आठ वर्षांच्या मुलीचे केस कापण्यासाठी न्हाव्याकडे घेऊन गेली होती. त्यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी न्हाव्याला अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाल्यानंतर मात्र महिलेने आपण केलेले आरोप खोटे असल्याचं कबूल केलं. मात्र, तिने असं का केलं, त्याचं काहीही कारण दिलं नाही.
महिलेने न्यायालयासमोर दिलेल्या कबुलीमुळे या प्रकरणातील आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आणि महिलेला पोक्सो अंतर्गत खोटे आरोप करण्यासाठी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली.
summery – woman punished for false complaint


























































