
अग्निशमन दलाचं काम खूप कठीण असतं. आग विझवण्यापलिकडे जाऊन अडकलेल्या माणसांची, प्राणीपक्षांची सुटका करण्याचं कामही ते करतात. अशाच एका घटनेत एका विवस्त्र अवस्थेत अडकलेल्या महिलेची सुटका अग्निशमन दलाने केली आहे.
ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागातल्या सँटा अॅना इथे घडली आहे. येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात मंगळवारी एक फोन आला. त्या फोनवर दोन इमारतींच्या मध्ये एक महिला अडकल्याची माहिती देण्यात आली. हा फोन एका दुकानदाराने केला होता.
त्याला महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. त्याने आवाजाच्या दिशेने शोध घेतला तेव्हा त्याला लक्षात आलं की, त्याचं दुकान ज्या इमारतीत आहे त्या आणि शेजारच्या इमारतीदरम्यान एक महिला अडकली होती.
या दोन इमारतींमध्ये फक्त अठरा इंचाची जागा होती. या जागेत ही महिला विवस्त्रावस्थेत अडकलेली दिसत होती. अखेर जेव्हा अग्निशमन दल आलं, तेव्हा त्यांनाही तिची सुटका कशी करावी ते समजेना. जागा कमी असल्याने तिचा श्वासही कोंडत होता. त्यासाठी त्यांनी मोठा पंखा आणून तिला श्वास घेता येईल अशी सोय केली. पण तरीही तिला त्या इमारतीच्या फटीतून बाहेर काढण्याचा प्रश्न होताच.
शेवटी त्यांनी इमारतीच्या छतावरून तिची सुटका करण्याचा मार्ग निवडला. त्यांनी जवळपास दीड तास खपून तिची सुटका केली. ही महिला नेमकी अडकली कशी असावी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सुटका केल्यानंतर घाबरून जवळपास बेशुद्ध पडलेल्या या महिलेला त्वरित वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.




























































