
शेतकऱ्याच्या सातबारावरील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारतांना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर सज्जाच्या तलाठी रत्नमाला शिंगारे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.
विशेष म्हणजे शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात तलाठी संघटना देखील सहभागी झाली होती. मात्र संपाच्या दिवशी लाच घेतल्याच्या आरोपावरून महिला तलाठी शृंगारे या जाळ्यात अडकल्या आहेत.औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील महसूल सज्जाच्या तलाठी रत्नमाला शृंगारे यांच्याकडे शिरडशहापूरसह असोला गावाचाही कार्यभार आहे. एका शेतकऱ्याच्या सातबारावर बँकेने चढवलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तलाठी शृंगारे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या दरम्यान शिरड शहापूर येथे सापळा लावला. यावेळी तलाठी शृंगारे यांच्यासह दोन जणांना संबंधित शेतकऱ्याकडून एक हजार रुपयाची लाच घेताना पकडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली आहे. तक्रारदार शेतकरी व दोन खाजगी इसमांची नावे सांगण्यास पोलीस उपाधीक्षक गायकवाड यांनी नकार दिला. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. पकडलेल्या दोन पैकी एक इसम हा तलाठ्यांचा लेखनिक मदतनीस असल्याचे समजते.
































































