सावळ्या रंगामुळे सुनेचा छळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबादमधील एका महिलेचा सासरच्यांनी छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या छळामागचे कारण वेगळेच असल्याने घटनेची गंभीरता वाढली आहे. त्या महिलेचा सावळा रंग आणि मोठे दात असल्यामुळे छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकतर कुरुप त्यात हुंडाही दिला नसल्याने तिला वारंवार टोमणे मारण्यात येत होते. सासरच्यांच्या नेहमीच्या टोमण्यांमुळे त्रस्त झालेल्या या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणंदमध्ये राहणाऱ्या या महिलेचे लग्न गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अहमदाबादमधील एका तरुणाशी झाले होते. लग्न झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. लहान लहान गोष्टींमध्ये खुसपट काढणे आणि टोमणे मारणे नेहमीचेच झाले. हुंडा दिला नाही यावरून टोमणे मारत अनेकदा जेवणही दिले नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मी श्रीमंत घरातील नसल्याने सासू नेहमी मला टोमणे मारत होती. तसेच सावळी असून दात मोठे आहेत, दिसायलाही चांगली नाही, त्यावरून शिव्या देत भांडणे करायचे आणि हुंड्याची मागणी करण्यात येत होती, असेही त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी हुड्यांसाठी छळ, अपशब्द, शिव्या देणे या गुन्ह्यांखाली तक्रार दाखल केली आहे.