निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडचा कॅमेरा हिसकावणार्‍या परदेशी महिलेला अटक

411

वाहन तपासणीस विरोध करत निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडचा कॅमेरा हिसकावणार्‍या परदेशी महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली. शीना लखानी असे तिचे नाव आहे. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे अंधेरी मतदारसंघाच्या क्षेत्रात कार्यकारी दंडाधिकारी या पदावर नियुक्त आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून वाहनचालकांच्या तपासणीसाठी सोमवारी रात्री मोहीम हाती घेतली होती. अंधेरीच्या वीरा देसाई मार्ग परिसरात नाकाबंदी सुरू होती तेव्हा शीनाला गाडी थांबवण्यास सांगितले. आपण परदेशी नागरिक असल्याचे सांगून आपल्या गाडीची तपासणी करू नये असे तिने अधिकार्‍यांना सांगितले. तिची गाडी अधिकार्‍यांनी सोडली. काही वेळानंतर ती परत आली. तिने गस्तीवर असलेल्या कर्मचार्‍याचा कॅमेरा हिसकावला. कॅमेरा परत करावा अशी अधिकार्‍यांनी तिला विनंती केली. तिने कॅमेर्‍यातील मेमरी कार्ड काढले. या घटनेची माहिती कळताच अंबोली पोलीस घटनास्थळी आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटक करून तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

बोरिवलीत साडेसात कोटींचे दागिने केले जप्त

गेल्याच आठवडय़ात समता नगर पोलिसांनी एक कोटी रुपयांची रक्कम पकडल्याची घटना ताजी असतानाच बोरिवली रेल्वे स्थानकात साडेसात कोटी रुपयांचे सोन्याचे आणि हिर्‍याचे दागिने पकडले. त्याचा पुढील तपास आयकर विभाग करत आहे.

गुजरात एक्स्प्रेसने काहीजण पैसे आणि सोने घेऊन जाणार असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री गुजरात एक्स्प्रेस बोरिवली रेल्वे स्थानकात आली. सहायक आयुक्त सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भास्कर पवार, सहायक निरीक्षक इरफान नदाफ यांच्या पथकाने गुजरात एक्स्प्रेसचे तीन कोच तपासले तेव्हा 19 जण हे बॅगा घेऊन जाताना आढळले. त्या सर्वाना चौकशीकरिता बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्या दागिन्यांची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या