महिलांवरील वक्तव्य गावितांना भोवले, महिला आयोगाने धाडली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन दिवसांत खुलासा मागितला
मासे खाणाऱया महिला चिकन्या असतात असे आक्षेपार्ह वक्तव्य मिंधे सरकारचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना चांगलेच भोवले आहे. राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत यासंदर्भात खुलासा करा असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकनी दिसायला लागते, स्त्रियांचे सौंदर्य खुलते असे वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केले होते. ऐश्वर्या राय मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत, असे उदाहरणही त्यांनी दिले हा;sते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. गावित यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत ऐश्वर्या आपल्या मुलीसारखी असल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य महिला आयोगाने आज त्यांना नोटीस धाडली.

अपशब्द बोलणाऱया लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई होणार
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. गावित यांनी केलेले वक्तव्य महिलांचा अवमान करणारे आहे, असे सांगतानाच, लोकप्रतिनिधींना कुठलेही उदाहरण देण्यासाठी महिलांची गरज का भासते असा सवाल चाकणकर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे यापुढे महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱया लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.