नाटक – वंडरफुल

>> क्षितिज झारापकर

सायली द वंडर गर्लआनंद म्हसवेकर. मराठी रंगभूमीशी इमान राखणारं गुणी नाव. विविध प्रयोग करीत रंगभूमी समृद्ध करणे हा त्यांचा वसा. या भावनेतूनच त्यांचे अजून एक नाटक रंगभूमीवर आले आहे.

1960 साली अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ. केनडी. त्यांनी त्यांच्या सलामीच्या भाषणात एक विधान केलं, ‘‘think not what the country can do for you, think what you can do for the country…’’ त्यांच्या आधी सुमारे शंभर वर्षांपूर्वीपासून मराठी रंगभूमीवरचे रंगकर्मी ही फिलॉसॉफी पाळत होते. मराठी रंगकर्मींनी रंगभूमी आपल्याला काय देते यापेक्षा आपण रंगभूमीला काय देतो हाच विचार सातत्याने केला आणि म्हणूनच मराठी रंगभूमी ही आजही इतकी सुदृढ आणि संपन्न उभी आहे. आजपर्यंतच्या अनेक मातब्बर नावाजलेल्या रंगकर्मींनी आपल्या उदरनिर्वाहाची इतर वेगवेगळी साधने जपून मराठी रंगभूमीशी इमान राखले. आजची आघाडीची काही नावेही यात सामील आहेत. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, शरद पोंक्षे ही काही उदाहरणे आहेत. सातत्याने मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्यांपैकी जनार्दन लवंगारे, आनंदा नांदोसकर, उपेंद्र दाते ही नावेही खूप महत्त्वाची आहेत. आपल्या इतर उद्योगांतून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम त्यांनी नाटकं उभी करण्यासाठी वापरली. त्यांचाही स्वतःचा एक विशिष्ट प्रेsक्षक वर्ग होता. या मांदियाळीत एक नाव आहे आनंद म्हसवेकर. म्हसवेकर मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटकं घेऊन कार्यरत राहिले आहेत. बदलत्या आर्थिक समीकरणाशीही म्हसवेकरांनी जुळवून घेत रंगमंचाची अट नाही सारखे नाटय़प्रयोगही केले. त्याचेच एक्सटेन्शन म्हणून आज काही तरुण रंगकर्मी तुमच्या घरात नाटक अशी एक्सपेरीमेन्टस् करत शंभर प्रयोगांचा पल्ला गाठताना दिसतात. म्हसवेकर हे मुळात लेखक. त्यांची नाटकं सभोवतालच्या मध्यमवर्गीय समाजातले त्या त्या वेळेचे निकडीचे प्रश्न घेऊन उभी राहतात आणि म्हणूनच ती मराठी नाटय़रसिकांना जवळची वाटतात. सध्या आनंद म्हसवेकर आपल्या जिव्हाळा या संस्थेमार्फत ‘सायली – द वंडर गर्ल’ हे नाटक घेऊन पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आहेत. ‘सायली – द वंडर गर्ल’मध्ये म्हसवेकर स्वतः ट्रिपल रोलमध्ये आहेत.

नाटकाचे लेखक म्हसवेकर आहेत. आजच्या उच्चमध्यमवर्गीय मराठी घरातला प्रश्न घेऊन हे नाटक आपल्या भेटीला येतं. नवरा-बायको दोघंही उच्चशिक्षित आणि कार्यनिपुण असणाऱ्या एका मराठी घरात त्यांची नऊ-दहा वर्षांची मुलगी आणि विधुर आजोबा आहेत. नवरा नोकरीसाठी परदेशात आहे आणि मुलगी चौथी-पाचवीमध्ये पोहोचेपर्यंत तिला आणि घराला सांभाळायचा करार पाळून बायको आता पुन्हा एकदा नोकरी सांभाळण्याच्या बेतात आहे. त्यात आजोबा हे मराठी रंगभूमीवर गाजलेले अभिनेते आहेत. अशा परिस्थितीत सुरू होतं ‘सायली – द वंडर गर्ल’. या एकाच नाटकात म्हसवेकरांनी अनेक प्रश्नांना हात घातलाय आणि प्रत्येक मुद्दय़ावर ते भाष्य करतात. त्यामुळे इथे बरीच नाटकं डोकावून जातात. उदाहरणार्थ प्रत्येक पात्राचं मनोगत येतं तिथे प्रकर्शाने नटसम्राट आपल्याला आठवतो. म्हसवेकरांचं लिखाण प्रेक्षकभिमुख असतं म्हणून ‘सायली – द वंडर गर्ल’ हे नाटक म्हणून उत्तरोत्तर प्रेक्षकांना गुंतवून ठेवत जातं.

या नाटकातला म्हसवेकरांचा दुसरा रोल दिग्दर्शकाचा आहे. आपण एक नाटक करत आहोत याचं संपूर्ण भान ठेवून आनंद म्हसवेकरांनी हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. नाटकाला पूरक आणि आवश्यक असं नेपथ्य अधोरेखित करेल, पण वरचढ होणार नाही असं संगीत आणि उगीचंच दिवाळी साजरी होतेय हे वाटणार नाही अशी प्रकाशयोजना म्हसवेकरांनी इथे साधली आहे. पण एका प्रसंगात जिथे आजोबा मुद्रभिनय करून दाखवतात तिथे दिग्दर्शकाने व्यवस्थित एलईडी पार वापरून अनेक रंगछटांची प्रकाशयोजना वापरलेली आहे. नाटक सादर करताना पात्रांच्या हालचालीला मुबलक जागा ठेवून रचलेला सेट आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यामुळे पात्र हलती राहतात आणि नाटकात स्वगतं पुष्कळ असूनही स्तब्धता भासत नाही. यात विनय आनंद, हरी सोळंकी, आशुतोष वाघमारे या सगळय़ा तंत्रज्ञांचा मोठा वाटा आहे.

‘सायली – द वंडर गर्ल’मध्ये म्हसवेकरांचा ट्रिपल धमाका हा तसा त्यांचा दुर्मिळ पैलू आहे. अभिनेते आनंद म्हसवेकर इथे निवृत्त रंगकर्मी आजोबांची भूमिका करताहेत. हे आजोबा अत्यंत रियलिस्टीक झालेत. वयोमानापरत्वे येणारा स्लोनेस म्हसवेकरांनी तंतोतंत अंगीकृत केलाय. नातीबद्दलचा जिव्हाळा त्यांच्या ठायीठायी दिसतो. नाटकातली अन्य कलाकार मंडळी प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत उभी राहतात आणि नाटक आपल्यापर्यंत पोहोचवतात. अजय झालेले अमित जांभेकर आपल्या लहान मुलीपासून दूर राहणाऱ्या बापाची भूमिका व्यवस्थित पेलतात. परदेशात तो करीत असलेली नोकरी केवळ पैशासाठी आहे की त्याच्या कार्यक्षेत्रात इथे वाव सीमित असल्याने आहे हे स्पष्ट होत नसूनही परदेशी एकटाच राहणारा बाप या इमोशनल अँगलने त्यांनी हे पात्र रंगवलंय आणि सार्ध केलंय. प्रज्ञा गुरव यांची केअरटेकर आजी उत्तम जमली आहे. सुचित ठाकूर शरद अत्यंत मनस्वी पद्धतीने साकारतात. अमृता राजेंद्र ही लहान रंगकर्मी आपल्या सायलीच्या टायटल रोलमध्ये चपखल बसते. ती कथ्थक शिकत असणार ज्याचा पूर्ण वापर नाटकात झालाय. अमृता आपली भूमिका वाजवते. नाटकात सर्वात प्रभावी आहे नीता दोंदेची आई. IIM मधून बिझनेस मॅनेजमेन्टची गोल्ड मेडलिस्ट पदवीधर आपलं गृहिणीपण किती फोकस्डपणे मॅनेज करते इथपासून ते येणाऱ्या सिच्युएशन्सना तोंड द्यायला आधीच कसं ती प्लॅनिंग करते इथपर्यंत नीता दोंदे केवळ पटत नाही तर ती अविभाज्य वाटते हे कौतुकास्पद आहे. मुलीला वळण लावणारी शिस्तप्रिय आई, दक्ष गृहिणी, वैचारिक प्रोफेशनल आणि प्रेमळ बायको अशा वेगवेगळय़ा छटा नीता कमालीच्या सहजतेने दाखवते. नाटकाची वेशभूषासुद्धा नीताने सुंदर सांभाळली आहे.

‘सायली – द वंडर गर्ल’ हे एक चांगल्या विषयावरचं नाटक आहे.

नाटक         सायली-द वंडर गर्ल

निर्माते       विजय म्हसवेकर, कांता म्हसवेकर

नेपथ्य         हरेश सोलंकी

प्रकाश        विनय आनंद

पार्श्वसंगीत       आशुतोष वाघमारे

नृत्य           स्मिता मोरे, विनोद कोरी

वेशभूषा      नीता दोंदे

सूत्रधार      गोटय़ा सावंत

लेखक,  दिग्दर्शक     आनंद म्हसवेकर

कलाकार  नीता दोंदे, प्रज्ञा गुरव, अमित  जांभेकर, सुचित ठाकूर, आनंद  म्हसवेकर, अमृता राजेंद्र

दर्जा        

आपली प्रतिक्रिया द्या