ही दांपत्ये रंगलीयेत रक्तचाचणीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संतोष आंधळे  

कोरोनाच्या या कठीण काळात बहुतांश कुटुंबातील सदस्य या आजारापासून दूर कसे राहता येईल किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे कसे टाळता येईल याचा विचार करत असताना मात्र मुंबई महानगर क्षेत्रातील ही तीन दांपत्ये मात्र कोरोना रुग्णांची रक्तचाचणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. विकृतीशास्त्रात (पॅथालॉजी) पदव्युत्तर शिक्षण घेतलेले हे सहा डॉक्टर कशाचीही तक्रार न करता कोरोना साथीच्या सुरुवातीपासून इमाने इतबारे सेवा करत आहेत. दररोज ही दांपत्ये आपापल्या रुग्णालयात आणि लॅबोरेटरीमध्ये शेकडोच्या संख्येने रक्ताचे नमुने तपासून अहवाल तयार करीत आहेत. कोरोनाच्या उपचारात अनेकदा या तज्ञांच्या अहवालावर उपचारांची दिशा ठरत असल्याने त्यांच्याशिवाय पुढचे उपचार डॉक्टरांना अवघड असते.

या तीन दांपत्यांमध्ये डॉ. योगानंद पाटील आणि डॉ. ललिता पाटील, डॉ. हेमंत भालेकर आणि डॉ.  सुरेखा भालेकर, डॉ. प्रशांत बनसोडे आणि डॉ. संगीत बनसोडे यांचा समावेश असून या सहाही डॉक्टरांचे काम रोज रक्ताचे नमुने तपासून रुग्णाच्या रक्तात नेमके कोणते बदल झाले याची माहिती ते रुग्णाला उपचार करणाऱया संबंधित डॉक्टरांना अहवालाद्वारे देत असतात.

डॉ. संगीत बनसोडे सांगतात, माझ्या पतीची चेंबूर येथे खासगी प्रयोगशाळा आहे.  मी नवी मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयातील  आरटी-पीसीआर या प्रयोगशाळेची प्रमुख म्हणून कार्यरत आहे. या काळात रजा न घेता आम्ही काम करत आहोत. आमचे एकच ध्येय या काळात आहे कोरोनाबाधित रुग्णांना जितकी सेवा देत येईल तितकी देत राहायची.

डॉ. ललिता पाटील सांगतात की, ‘आम्ही दोघेही 14 वर्षे सरकारी सेवेत असून  मी अतिरिक्त प्राध्यापक म्हणून नायर रुग्णालयात तर माझे पती जगजीवन राम रुग्णालयात विकृतीशास्त्र आणि रक्तपेढी विभागप्रमख म्हणून काम करीत आहोत. दोघेही सकाळी घर सोडतो आणि रुग्णालयात जाऊन रक्ताच्या तपासण्या करत असतो. या कोविडच्या काळात एक वेळ अशी आली की, मी आणि माझे पती आणि दोन्ही मुलींना या आजाराची बाधा झाली आणि संपूर्ण कुटुंब या आजारावरील उपचार घेत होतो. मात्र सुदैवाने घरीच विलगीकरण करून आम्ही उपचार घेतले आणि बरे होऊन पुन्हा कामावर रुजू  झालो आहोत.

नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विकृतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करणाऱया डॉ. सुरेखा भालेकर सांगतात, हा साथीचा आजार आम्हा सगळ्यांसाठीच नवीन असल्याने विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती  पाहिजे म्हणून या विषयातील सर्व बारकावे मी विद्यार्थ्यांना शिकवीत असते. तर माझ्या पतीची पनवेल येथे खासगी लॅबोरेटरी असून त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात कोरोना आजाराच्या संबंधित रक्ताचे नमुने येत असतात. या काळात पैसे कमवायचे नसतात हे माझ्या नवऱयाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने सामाजिक काम करणे, रोटरीच्या सहभागातून रक्तपेढी चालविणे हे काम ते करत आहेत.