
पहाटेच्या वेळेस इमारतीच्या टेरेसवर केबल लाइनचे काम करणे महिलेला जिवावर बेतले. निकिता सनी अरोरा असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सनी अरोरा यांचा केबलचा व्यवसाय आहे. केबलच्या कामात निकिता ही त्यांना मदत करायची. दोन दिवसांपूर्वी खालचा तुंगा येथील एमटीएनएलच्या इमारतीवर नवीन केबल लाइन टाकण्याचे काम निकिता आणि सनी हे करत होते. नवीन केबल लाईन टाकण्याच्या कामासाठी ते रात्री पुन्हा टेरेसवर आले. एका इमारतीत सनी तर दुसऱ्या इमारतीच्या टाकीवर निकिता उभी होती. सनीने टाकलेली केबल निकिता ओढत होती. केबल ओढत असतानाच ती टेरेसवरून खाली पडली. सुरक्षा रक्षकाने याची माहिती पवई पोलिसांना दिली. पोलिसांनी निकिताला रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी निकिताचा पती आणि तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवल्याचे सहाय्यक निरीक्षक अनंता गायकवाड यांनी सांगितले.






















































