
>>जयेंद्र लोंढे
जागतिक शरीरसौष्ठवात मुंबईची ‘पॉवर’ दिसू लागलीय. चेतन पाठारे या मराठमोळय़ा व्यक्तीची जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी मराठी झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकला. शरीरसौष्ठव या खेळामध्ये वडील मनोहर यांनी जीवन वेचल्यानंतर आता मुलगा चेतन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. या खेळाला भव्य उंची गाठून देण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे.
जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर कसे वाटले? त्यावेळच्या भावनांबद्दल सांगा…
– जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष दातुक पॉल चुआ यांनी जेव्हा सरचिटणीसपदासाठी माझी निवड केली तेव्हा भावुक झालो. माझ्या डोळय़ांसमोर वडील मनोहर नारायण पाठारे यांचा चेहरा आला. त्यांनी या खेळासाठी खूप काही दिले. असंख्य खेळाडू घडवले. आता मला या खेळाला पुढे न्यायचे आहे. हीच भावना माझ्या मनामध्ये आहे.
शरीरसौष्ठवातील संघटनात्मक वादाचा फटका खेळ व खेळाडूंना बसतोय याबाबत काय सांगाल?
हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघात 2011-12 पासून सरचिटणीस पदावर कार्यरत आहे. खेळ व खेळाडूंच्या हितालाच प्राधान्य देण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. बहुतांशी राज्यांतील संघटना आमच्याशी संलग्न झाले आहेत. सरकारकडूनही आम्हाला मान्यता मिळालीय. त्यामुळे खेळाडूंच्या नोकऱयांचाही प्रश्न उद्भवत नाही.
या खेळावर सातत्याने डोपिंगचे वादळ घोंघावत असते. त्यामुळे हा खेळ मागे पडलाय असे वाटते का?
-नक्कीच नाही. पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग या खेळामधील खेळाडू डोपिंगमध्ये अडकलेले दिसतात. एवढेच नव्हे तर ‘नाडा’च्या यादीवर नजर टाकल्यास डोपिंगमध्ये अडकलेले सर्वाधिक खेळाडू ऍथलेटिक्समधील आहेत हे प्रकर्षाने दिसून येईल. शरीरसौष्ठव डोपिंगपासून दूर राहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोणत्या उपाययोजना यासाठी राबवण्यात येत आहेत?
आमच्याकडून सातत्याने सेमिनारचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये खेळाडूंना डोपिंगबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. जेणेकरून युवा खेळाडू यापासून दूर राहतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात येते. डोपिंगसारखा काळा डाग या खेळाला लागू नये याची काळजी घेण्यात येत आहे.
डाएट, जिममुळे हा खेळ महागडा ठरतो. अशा वेळी खेळाडूंना तुमच्याकडून कशा प्रकारची मदत केली जात आहे?
आम्ही दरवर्षी विविध स्पर्धांमधून बक्षिसांवर सुमारे दीड कोटी खर्च करतो. तसेच 35 खेळाडूंचा सर्व खर्चही आम्ही पेलत आहोत. यामध्ये गुणवत्ताप्रधान तसेच स्पर्धामधून चमकणाऱया खेळाडूंचा समावेश आहे. कबड्डी व खो-खो या आपल्या मातीतल्या खेळाला सरकारकडून निधी मिळत आहे, मात्र आमच्या खेळाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीए. आगामी काळात तो मिळवण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर सरकारकडून आम्हाला निधी मिळू शकेल. आतापर्यंत स्वबळावर सर्व काही करीत आहोत.
कोणते ध्येय डोळय़ांसमोर ठेवले आहे?
– जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झालीय. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढलीय. 138 देश संलग्न असून मुंबई महाराष्ट्र, हिंदुस्थानसह सर्व देशांमध्ये शरीरसौष्ठव या खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन. जागतिक स्तरावर या खेळाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेन.




























































