जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप- मंजू राणी उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानला सोमवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये संमिश्र यश मिळाले. एकीकडे मंजू राणीने 48 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली तर दुसरीकडे मंजू बामबोरिया हिला 64 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. सहाव्या सीडेड मंजू राणी हिने वेनेझुएलाच्या रोजास तायोनिसचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणाऱया मंजू राणी हिला आता या स्पर्धेत पदक निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची नितांत गरज आहे.

1-4 ने पराभव
मंजू बामबोरियासमोर 64 किलो वजनी गटात इटलीच्या अँजेला करिनी हिचे आव्हान होते, मात्र युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱया अँजेला करिनीने ही लढत 4-1 अशा फरकाने जिंकली. स्पिल्ट निकालानुसार मंजू बामबोरियाला हार सहन करावी लागली.

मेरी कोम, स्विटी आज लढणार
हिंदुस्थानची दिग्गज खेळाडू मेरी कोम उद्या लढणार आहे. पहिल्या फेरीत तिला पुढे चाल देण्यात आली होती. आता उद्या तिला 51 किलो वजनी गटात थायलंडच्या जुतामस जितपोंग हिचा सामना करावा लागणार आहे. स्विटी बुरा हिला 75 किलो वजनी गटात लॉरेन प्राईसला लढत द्यावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या