
ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंदुस्थानमध्ये झालेल्या दुसऱ्या बुद्धिस्ट समिटमुळे तिबेटी जनतेच्या समस्या सगळ्या जगाच्या समोर मांडण्यात आल्या आणि त्यामुळे चीनला थोडाफार शह देण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळालेले आहे. मात्र तिबेटी स्वातंत्र्य लढय़ाची वाट आज तरी बिकट दिसत आहे. त्यांना सगळ्या जगाने आणि हिंदुस्थानींनी मदत करण्याची गरज आहे.
दोन दिवसीय जागतिक बौद्ध परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण हिंदुस्थानकडे होते. हिंदुस्थानी सांस्कृतिक मंत्रालय व आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन यांनी एकत्रितरीत्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात हिंदुस्थानच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्त्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली.
राजधानीतील अशोका हॉटेलमध्ये (20-21 एप्रिल) दोन दिवसीय परिषदेला सुरुवात झाली. त्यात सुमारे 30 देशांचे प्रतिनिधी आणि परदेशातील सुमारे 180 प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले. जागतिक बुद्ध समिटमध्ये सर्वात महत्त्वाची उपस्थिती होती तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची. पहिले असे वाटत होते की, चीनच्या भीतीमुळे त्यांना या समितीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार नाही. याआधी कुठल्याही हिंदुस्थानी सरकारने उघडपणे दलाई लामा यांना अशा प्रकारच्या समिटमध्ये भाग घेऊ दिला नव्हता. मात्र चीनच्या मल्टी डोमेन युद्धाला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने या वेळेला दलाई लामा यांना या समिटमध्ये आपले विचार व्यक्त करण्याची परवानगी दिली. दलाई लामा यांनी अतिशय साफपणे सांगितले की, तिबेटवर चीन अत्याचार करत आहे. बुद्ध जगातील आलेल्या सगळ्या प्रतिनिधींसमोर हे भाषण झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिबेटचे आणि तिथल्या बुद्ध धर्मीयांच्या चीनची विविध आक्रमणे, आव्हाने जगासमोर मांडण्यामध्ये दलाई लामांना आणि हिंदुस्थानला यश मिळाले. अर्थातच चीनला हे आवडलेले नाही.
तिबेटचे बौद्ध नेते दलाई लामा म्हणाले की, तिबेटमधील संकट करुणा, शहाणपण आणि ध्यानाच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे, जी बौद्ध तत्त्वज्ञानाची पेंद्रीय मूल्ये आहेत. ते म्हणाले की, ही तीन मूल्ये भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अविभाज्य भाग आहेत.
दलाई लामा यांनी सुमारे अर्धा तास चाललेल्या भाषणात सद्य परिस्थितीच्या संदर्भात बौद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले की, तिबेटमधील सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी व्यापक मन आणि धैर्य लागते. बुद्धाच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना तिबेटी नेत्याने सांगितले की, सर्व काही परस्परावलंबी आहे. निसर्गात वेगळेपणा नाही. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात समस्या असू शकतात, ज्या कदाचित मोठय़ा आणि अव्यवस्थापित वाटतील, पण त्यावर उपाय शोधता येतात.
चीनने 7 ऑक्टोबर 1949 रोजी स्वतंत्र तिबेटवर आक्रमण केले. 17 मार्च 1959 ला दलाई लामा यांनी ल्हासाहून पलायन केले व आपल्या 60 हजार तिबेटी शरणार्थींसोबत हिंदुस्थानात येऊन राजनीतिक शरण घेतली.
दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये आपले सरकार स्थापन केले, परंतु त्याला जगातील कुठल्याही राष्ट्राने मान्यता दिली नाही. चीनने तिबेटवर केलेल्या हल्ल्यात 10 लाखांहून तिबेटी मारले गेले . 1980, 1990 आणि 2008 या वर्षांमध्येही चीनविरुद्ध उठाव झाला होता, परंतु त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही.
आज तिबेटवर चीन विविध प्रकारे आक्रमण करतो. एक आक्रमण म्हणजे सांस्कृतिक आक्रमण. मूळ तिबेटन संस्कृतीला बरबाद करून चिनी संस्कृती रुजवायची. दुसरे आर्थिक आक्रमण. त्याप्रमाणे इथे मोठय़ा प्रमाणात खाणकाम सुरू आहे. तिबेटची अर्थव्यवस्था ही शेती, मेंढय़ा पाळणे आणि पर्यटन यावर अवलंबून आहे. त्यामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिसरे, तिबेटचे पाणी पळवण्याचे कारस्थान. तिबेटमधील पाणी चीन आपल्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे.
तिबेटचे चिनीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. चिनी नागरिक तिबेटमध्ये रहायला जात आहेत. तिबेटची राजधानी ल्हासा येथे 2 लाखांहून चिनी आहेत आणि मूळ तिबेटन रहिवासी केवळ 1 लाखच आहेत.
चीन तिबेटमधील रहिवाशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चीनविरुध्द आंदोलने करण्याची परवानगी नाही. जे चीनविरुध्द बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पकडून शिक्षा केली जाते. शाळेतील शिक्षक, धर्मगुरू किंवा लेखक, आंदोलक किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते, तिबेटविषयी चांगले लिहिणारे कवी, गायक या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. तिबेटमध्ये चिनी सैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्याशिवाय प्रत्येक 500 तिबेटियन लोकांवर एक पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहे. तरीही तिबेटी लोकांची आंदोलने सातत्याने सुरू असतात. त्यापैकी एक मोठा दुर्दैवी प्रकार म्हणजे स्वतःला जाळून घेणे. आतापर्यंत 180 तरुणांनी तिबेट स्वतंत्र व्हावा म्हणून आत्मदहन केले आहे.
तिबेटी भाषा पुढे वाढू नये यासाठी त्यावर बंदी आहे. तिबेटी गाणी, कविता, कथा यांच्यावर लक्ष ठेवले जाते. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा पह्टो लावण्याची परवानगी नाही. 6 हजारांहून जास्त तिबेटन मॉन्सेन्ट्रीज नष्ट करण्यात आल्या आहेत.
तिबेटी लोकांची संख्या वाढू नये म्हणून तिबेटियन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लादली जाते. हजारो तिबेटियन मुलींना परवानगीशिवाय या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. जे तिबेटी कार्यकर्ते रेझिस्टन्स चळवळीत भाग घेतात, त्यांना राजकीय पैदी म्हणून अटक केली जाते आणि त्यांना विकासकामांमध्ये जबरदस्तीने मजुरी कामास ठेवले जाते किंवा चिनी सैन्याकरिता काम करण्यास भाग पाडले जाते. थोडक्यात चीन तिबेटवर अनेक प्रकारेआक्रमण करत आहे. काही तज्ञांच्या मते शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्ट पॉवर, आध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला, त्यावेळेला अशा प्रकारे देश वेगळे होतील अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की, कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत मिळेल.






























































