जगाला आता आणखी युद्ध परवडणारे नाही

881

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जगाला आता आणखी युद्ध परवडणारे नाही. दोन्ही देशांनी आक्रमकता सोडून द्यावी आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनिओ गुतेरेस यांनी गुरुवारी बजावले. आम्ही तणाव कमी करण्यासाठी तसेच युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुतेरेस यांच्या वतीने त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रक जारी केले. अमेरिका आणि इराणने शांततेच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत, तरच आखाती राष्ट्रांत सर्वकाही ठिक होईल, असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकामध्ये आक्रमकता कमी करणे, शांतता राखणे, सामंजस्याने बोलणी करणे तसेच इतर देशांबरोबरचे संबंध वाढवणे या चार मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. अमेरिकेने ड्रोन हल्ला करून इराणचे लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

दोघांच्या संघर्षाचा इराकला फटका नको!

अमेरिका-इराणमधील तणावाचे इराकला परिणाम भोगायला लागता कामा नये, असेही संयुक्त राष्ट्रसंघाने ठणकावले आहे. इराणने बुधवारी अमेरिकेच्या लष्करी तळाजवळ केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने पुन्हा एकदा इराकी सार्वभौमत्त्वाला धक्का बसला आहे. तातडीने हा संघर्ष थांबवा आणि चर्चा सुरू करा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या