वर्ल्ड चॅम्पियन सिंधूला थेट प्रवेश मिळणार नाही, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड चॅम्पियन पी व्ही सिंधू हिला आगामी वर्ल्ड टूअर फायनलमध्ये थेट प्रवेश मिळणार नाहीए. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून यंदा नवा नियम तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत आता हिंदुस्थानच्या या खेळाडूला आशियाई लेगमधील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गुणांची कमाई करावी लागणार आहे. त्यानंतरच तिला वर्ल्ड टूअर फायनलमध्ये सहभागी होता येणार आहे.

थायलंडमधील बँकॉक येथे वर्ल्ड टूअर फायनल ही स्पर्धा पार पडणार आहे. दरवर्षी वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटूला या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे बर्याच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून यंदा नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे.

लक्ष्य ऑल इंग्लंड व ऑलिम्पिक पदकाचे

पी व्ही सिंधू हिचे वडील रमन्ना यावेळी म्हणाले, सिंधूने डेन्मार्क ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. पण याचा पश्चात्ताप झालेला नाही. आशियाई लेगमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न ती करू शकते. तसेच ती वर्ल्ड चॅम्पियन झालीय. शिवाय ती वर्ल्ड टूअर फायनलही जिंकलीय. सध्या तिचे लक्ष्य ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप व टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे आहे.

तीन स्पर्धा बाकी

वर्ल्ड टूअर फायनलआधी तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबरपासून (मंगळवार) डेन्मार्क ओपनला सुरूवात होणार आहे. त्यानंतर पुढल्या वर्षी 12 ते 17 जानेवारीमध्ये आशियाई एक आणि 19 ते 24 जानेवारीमध्ये आशियाई दोन या स्पर्धा होणार आहेत. वर्ल्ड टूअर फायनल ही स्पर्धा 27 ते 31 जानेवारी या कालावधीत पार पडेल. त्याआधी होणाऱया तीन स्पर्धांमधील गुणांकनाच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. पी व्ही सिंधूने डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली आहे. त्यामुळे तिला आशियाई दोन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.