रुद्रांक्ष पाटीलला कांस्यपदक – विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

मराठमोळय़ा रुद्रांक्ष पाटीलने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शुक्रवारी कांस्यपदकाची कमाई केली. 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्याने 262.2 गुणांसह हे पदक जिंकले. शेंग लिहाओ व डू लिंशू या चिनी नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकविले. रुद्रांक्ष पाटील व हृदह हजारिका या हिंदुस्थानी खेळाडूंनी अंतिम 8मध्ये स्थान मिळवत फायनल गाठली होती. हिंदुस्थान या स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्य अशा एकूण 5 पदकांसह गुणतक्त्यात दुसऱया स्थानी आहे. चीनने 5 सुवर्ण, एक रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 8 पदकांची कमाई करीत स्पर्धेत दबदबा कायम ठेवलाय. आता महिलांच्या 10 मीटर एअर रायफलची पात्रता फेरी आणि 25 मीटर पिस्टल पात्रता फेरीत एकूण 52 खेळाडू सहभागी होतील. यात यजमान हिंदुस्थानच्या 10 महिला नेमबाज कौशल्य  पणाला लावतील.