
हिंदुस्थानी बनावटीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज मंजुरी दिली. हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती केली आहे. डब्लूएचओच्या मंजुरीमुळे आता कोव्हॅक्सिनला अन्य देशांमध्येही मान्यता मिळेल आणि ही लस घेतलेल्या नागरिकांना परदेशी प्रवास करता येईल.
हिंदुस्थानात केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनला परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत कोटय़वधी नागरिकांनी ही लस घेतली आहे. परंतु डब्लूएचओची मान्यता नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा वापर करता येत नव्हता. भारत बायोटेकने एप्रिलमध्ये लसीच्या मान्यतेसाठी डब्लूएचओकडे अर्ज केला होता. त्यानंतर जुलैमध्ये आवश्यक चाचणी अहवालही सादर केले होते.. कोव्हॅक्सिन लस ही कोरोनाची लक्षणे आढळणाऱया रुग्णांवर 77.8 टक्के तर डेल्टा व्हेरिएंटवर 65.2 टक्के प्रभावी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
डब्लूएचओच्या तांत्रिक सल्लागार मंडळाची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. त्या बैठकीत कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली होती. मंडळाने कोव्हॅक्सिन ही कोरोनाविरोधात प्रभावी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींना ऑस्ट्रेलियाने प्रवासाची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्या आंतरराष्ट्रीय सीमांवर घातलेले निर्बंधही उठवले आहेत.





























































