विक्रमासाठी काहीही…विवस्त्र होऊन बर्फात बसला तब्बल दोन तास!

1025

सामना ऑनलाईन । व्हिएन्ना

जगभरात विविध धाडसी प्रकार करून किंवा जगावेगळी गोष्ट करून विक्रम नोंदवण्याची चढाओढ लागलेली असते. बर्फाचा तुकडा हातात पाच मिनिटे पकडणेही सर्वसाधारण माणसांना कठीण असते. मात्र, विक्रम प्रस्थापित करण्यासाठी एका व्यक्तीने विवस्त्र होऊन बर्फामध्ये तब्बल दोन तास बसण्याचा विक्रम केला आहे. सर्वसामान्य व्यक्ती जास्तीतजास्त पाच मिनिटे बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये बसू शकतो. मात्र, ऑस्ट्रियाच्या एथलीट जोसेफ कोएबर्ल या माणसाने तब्बल दोन तास, आठ मिनिटे आणि 47 सेंकद बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये बसून विक्रम स्थापित केला आहे. याआधीही त्याने असे विक्रम केले आहेत.

विशेष म्हणजे या बर्फाने भरलेल्या डब्यात जोसेफने विवस्त्र प्रवेश केला होता. त्यानंतर त्या डब्यात बर्फाचे तुकडे टाकून तो बर्फाने भरण्यात आला. याआधी चीनचा एथलीट जिन सोंगहाओ याने 53 मिनिटे, 10 सेंकद बर्फात बसून विक्रम स्थापित केला होता. त्याचा हा विक्रम जोसेफने मोडीत काढला आहे. जोसेफच्या या विक्रमासाठी व्हिएन्नामध्ये एक विशेष पारदर्शक बॉक्स तयार करण्यात आला होता. त्यात बर्फाचे तुकडे टाकण्यात आले. त्यानंतर जोसेफने विवस्त्र होऊन या बॉक्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी बर्फाचे तुकडे टाकून हा बॉक्स बर्फाने भरण्यात आला.

हा विक्रम करण्याआधी जोसेफची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच बॉक्समधून बाहेर आल्यावरही त्याची वैद्यकीय चाचणी करून शरीराचे तापमान तपासण्यात आले. तसेच या विक्रमादरम्यान अॅम्बुलन्सही तैनात ठेवण्यात आली होती. आपण आणखी काही वेळ बर्फात बसू शकत होतो. मात्र, विक्रम झाल्याचे समजल्यानंतर आपण दोन तासांनी बाहेर येण्याचा निर्णय घेतल्याचे जोसेफने सांगितले. आता आपला हा विक्रम कोण मोडणार याची उत्सुकता असल्याचेही जोसेफने सांगितले. एका टीव्ही शोदरम्यान चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एक तास बर्फाच्या बॉक्समध्ये बसल्यानंतर असा विक्रम करण्याचा निर्णय घेतल्याचे जोसेफने सांगितले.

सध्या विक्रम स्थापित करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यात येते, हा मूर्खपणा असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रम स्थापित करण्यासाठी काही नियम आणि मर्यादा असाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या विक्रम करण्यामुळे जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो, त्याकडेही काही संस्थांनी लक्ष वेधले आहे.