कसोटी क्रिकेटचा किंग ‘न्यूझीलंड’, हिंदुस्थानला हरवून जेतेपदावर मोहोर

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने बुधवारी साऊथम्पटनमध्ये इतिहास रचला. न्यूझीलंडने हिंदुस्थानला आठ गडी राखून पराभूत करीत पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर रूबाबात मोहोर उमटवली. टीम साऊथी, ट्रेण्ट बोल्ट, काईल जेमिसन, नील वॅगनर या वेगवान गोलंदाजांनी विजयाची भक्कम पायाभरणी केल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन (नाबाद 52 धावा) व अनुभवी रॉस टेलर (नाबाद 47 धावा) यांनी न्यूझीलंडच्या विजयाचा कळस चढवला. न्यूझीलंडने टीम इंडियाकडून मिळालेले 139 धावांचे लक्ष्य अवघे दोन गडी गमावत पूर्ण केले.

जेमिसनच्या जाळ्यात पुन्हा कोहली अडकला

हिंदुस्थानने दोन बाद 64 या धावसंख्येवरून सहाव्या दिवशी खेळायला सुरूवात केली. काईल जेमिसन या उंचपुऱया वेगवान गोलंदाजाने सकाळचे सत्र गाजवले. त्याने सुरूवातीला कर्णधार विराट कोहलीला (13 धावा) जाळ्यात अडकवले. या कसोटीत त्याने दोन वेळा टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूला बाद केले. त्यानंतर काईल जेमिसनने चेतेश्वर पुजाराला (15 धावा) स्लीपमध्ये उभ्या रॉस टेलरकरवी तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेण्ट बोल्टने उपकर्णधार अजिंक्य रहाणेला 15 धावांवर बी जे वॉटलिंगकरवी झेलबाद केले.

29 धावांत पाच फलंदाज बाद

हिंदुस्थानचा निम्मा संघ 109 धावांत गारद झाला. त्यानंतर रिषभ पंतने (41 धावा) तळाच्या फलंदाजांसोबत आक्रमक फलंदाजी करीत टीम इंडियाचा धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानचा डाव 142 या धावसंख्येवरून 170 धावांमध्येच आटोपला. 29 धावांमध्ये टीम इंडियाने पाच फलंदाज गमावले. टीम साऊथीने 48 धावा देत चार, ट्रेण्ट बोल्टने 39 धावा देत तीन, काईल जेमिसनने 30 धावा देत दोन आणि नील वॅगनरने 44 धावा देत एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

  • हिंदुस्थान पहिला डाव सर्व बाद 217 धावा
  • न्यूझीलंड पहिला डाव सर्व बाद 249 धावा
  • हिंदुस्थान दुसरा डाव सर्व बाद 170 धावा
  • न्यूझीलंड दुसरा डाव 2 बाद 140 धावा
आपली प्रतिक्रिया द्या