जगातील सर्वात मोठे आंब्याचे पान, कुडाळचा शेतकरी ठरला जागतिक रेकॉर्ड होल्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विठ्ठलवाडी येथील प्रगतशील शेतकरी व बागायतदार चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. काजरेकर हे जागतिक रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत. निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. याबाबत काजरेकर यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे 32 वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आपली आंबा व काजू बागायतीचीआवड जोपासत असताना काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्म पर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुलगी डॉ. नालंदा काजरेकर – परब व डॉक्टर नुपूर काजरेकर – अगरवाडकर, जावई धीरज परब व डॉ.देवेन अगरवाडकर यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पूनर्रतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ.विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकूर, प्राध्यापक उमेश कामत, प्राध्यापक दयानंद ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना सहकार्य केले. त्या कामात डॉ.दिपाली काजरेकर, डॉ.नालंदा काजरेकर-परब, डॉ. नुपूर अगरवाडकर, जावई धीरज परब, डॉ.देवेंद्र अगरवाडकर तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभल्याचे काजरेकर यांनी सांगितले.

जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली आहे. कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदले गेले आहे. या पानाची लांबी 55.6 सेमी रुंदी 15.6 सें.मी.आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपाऱ्या व काजूची रोपे तयार करून नर्सरी चा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे सावंतवाडी येथील शेतात त्यांचे बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.